सिल्लोड, (प्रतिनिधी) अजिंठा (ता. सिल्लोड) येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते झाले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने या इमारतीसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अजिंठा येथे उभारण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय हे नागरिकांसाठी वैद्यकीय सेवांचा आधारस्तंभ ठरेल असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
अजिंठा व परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालयाद्वारे प्राप्त होतील. रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. निधीची कमतरता भासू देणार नाही असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा.गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग पा साळवे, नंदकिशोर सहारे दामू अण्णा गव्हाणे, देविदास लोखंडे, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर, पांडुरंग गवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजयकुमार सोनवणे, शाखा अभियंता वसीम देशमुख, सयाजीराव वाघ, माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम संजय डमाळे, प्यारेलाल जयस्वाल, राजू बाबा काळे, अजिंठाचे सरपंच नजीर अहमद सय्यद नासिर हुसेन, अब्दुल अजीज चाउस, शेख लुकमान, समी चाउस, दिलीप झलवार, सय्यद एजाज, तारेख चाउस, आजम खान, शिवा झलवार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मतदारसंघात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत मतदारसंघात सिल्लोड, सोयगाव आणि अजिंठा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. सिल्लोड आणि सोयगाव येथील इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथे जागेचा प्रश्न होता त्यामुळे काम सुरू करण्यास उशीर झाला. आता भूमिपूजन झाले त्यामुळे सदरील काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मुळे हे गाव जागतिक नकाशावर असल्याने येथे विकासासाठी निधी कमी पडणार नाही. नवीन होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथे पाईप लाईन व जलकुंभ व येथे आरोग्य कर्मचारी यांचे निवास्थानसाठी प्रस्ताव सादर करावा, यासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देवू अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
अजिंठा येथे गेल्या दीड वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय मंजूर होते मात्र जागे अभावी प्रश्न प्रलंबित होता.
येथील स्व. भगवानराव झलवार यांनी उपजिल्हा रुग्णालय बांधकाम साठी आपली स्वतःची जमीन दान दिल्याने या जागेचा तिढा सुटला आणि त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करता आले. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी भगवान झलवार यांच्या पत्नी कलाबाई झलवार तसेच त्यांचे चिरंजीव दिलीप झलवार, दीपक झलवार, संदीप झलवार व प्रशात झलवार यांचा सत्कार करून झलवार परिवाराचे आभार मानले.